प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा नगरपालिकेच्या हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या 'पवन नगर' (कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट) पाठीमागील भाग) येथील रहिवासी मागील अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. पालिकेकडून घरपट्टी, पाणीपट्टी यांसारखे कर नियमितपणे वसूल केले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र येथील नागरिकांना साध्या गटारी, रस्ते आणि पथदिव्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा भाग गेल्या १० ते १५ वर्षांपासून विकसित होत आहे. नगरपालिकेच्या हद्दवाढीत या भागाचा समावेश झाल्यानंतर रहिवाशांना सुखसुविधा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, आजही येथील रस्ते अस्वच्छ, गटारींची दुरवस्था आणि रात्रीच्या वेळी परिसरात अंधार पसरलेला असतो. रहिवाशांनी अनेकदा नगरपालिकेकडे तक्रारी आणि निवेदने दिली आहेत, परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
नगरपालिकेकडून नियमितपणे घरपट्टी व इतर करांच्या वसुलीसाठी नोटिसा पाठवल्या जातात. नागरिक हे कर प्रामाणिकपणे जमा सुद्धा करीत आहेत तरीही, मोबदल्यात नगरपालिकेकडून कसलीही विकासकामे केली जात नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
लक्ष्मण पाटील, युवराज सुतार, दीप्ती नेमाडे, रविंद्र नेमाडे, ईश्वर बडगे आणि संदिप कोष्टी यांच्यासह असंख्य पवन नगरमधील रहिवाशांनी मुख्याधिकारी सावदा यांचेकडे निवेदन सादर केले आहे. जर लवकरच या भागात रस्ते, गटारी आणि पथदिव्यांची सोय उपलब्ध करून दिली नाही, तर मात्र तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आता सावदा नगरपरिषद प्रशासन या त्रस्त नागरिकांच्या मागण्यांकडे केंव्हा आणि कधी लक्ष देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ठिकाणी आपल्या व्यवसायाची जाहिरात पहा.










Post a Comment