प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
आदिवासी समाजाचे दैवत, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि 'धरती आबा' म्हणून ओळखले जाणारे जननायक "बिरसा मुंडा" यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध व शोषणाविरोधात लढा देऊन आदिवासी हक्कांचे रक्षण केले. त्यांच्या जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी दिलेल्या ऐतिहासिक बलिदानाचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी जागतिक आदिवासी दिन मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो.
याच औचित्यावर सावदा नगरपालिकेत प्रथमच आदिवासी बांधवांच्या वतीने जननायक बिरसा मुंडा यांची प्रतिमा नगराध्यक्षा रेणूका पाटील यांना सप्रेम भेट देण्यात आली. रविवार हा सुट्टीचा दिवस असूनही आदिवासी बांधवांच्या भावनांचा आणि आदराचा मान राखत नगराध्यक्षा रेणूका पाटील यांनी पालिकेत स्वतः उपस्थित राहून या प्रतिमेचा स्वीकार केला व प्रतिमेस विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी त्यांनी सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या स्नेहपूर्वक शुभेच्छा दिल्या. आदिवासी समाजाच्या भावनांचा आदर करत सुट्टीच्या दिवशीही वेळ दिल्याबद्दल नगरसेविका सिमरन वानखेडे यांनी नगराध्यक्षांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी नगरसेविका रेखा वानखेडे, सिमरन वानखेडे, विशाल सोनवणे, सुनील जंगले यांच्यासह सिमरन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली अशरफ तडवी, नवाब तडवी व सर्व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संध्याकाळच्या सत्रात बस स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत पारंपारिक वादय ढोल '३ स्टार ढोलक ग्रुप' (खिरोदा) येथील २० कलाकारांचा समूह आणि 'शिवनेरी बँड पार्टी सावदा' यांच्या डी.जे.च्या तालावर समाजबांधव आणि युवक मोठ्या उत्साहात सहभागी झाले. सावदा शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक अतिशय दिमाखात काढण्यात आली.
मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन व गृह रक्षक दलाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सर्व उपक्रम अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पडले.











إرسال تعليق