इलेक्ट्रिशियनमध्ये मयूरला ९३, तर फिटरमध्ये नीरजला ८५ टक्के गुण; संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून विद्यार्थी व निदेशकांचे अभिनंदन
प्रतिनिधी | चिनावल
नूतन प्राथमिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), चिनावलचा नुकताच जाहीर झालेल्या परीक्षेचा निकाल ९२ टक्के लागला असून संस्थेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये मयूर चौधरी याने ९३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर फिटर ट्रेडमध्ये नीरज सपकाळे याने ८५ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
संस्थेतील विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, नियमित प्रात्यक्षिक सराव आणि निदेशकांचे मार्गदर्शन च्या जोरावर हे यश मिळवले आहे. निकालामध्ये विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केल्याने संस्था, पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना प्राचार्य संदीप चौधरी म्हणाले, “विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या मेहनतीचे आणि निदेशकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. आय.टी.आय.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ प्रमाणपत्र मिळत नाही, तर प्रत्यक्ष कामाचे कौशल्य आणि रोजगाराच्या संधी मिळतात. विद्यार्थ्यांनी या कौशल्याचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सुरू करून इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. पुढील काळातही संस्थेचा निकाल आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणखी उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.”
संस्थेच्या या उल्लेखनीय निकालाबद्दल अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष राजेंद्र पालक, चेअरमन खेमचंद्र पाटील व सचिव गोपाळ पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थ्यांना नियमित व गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणाऱ्या सर्व निदेशकांचेही त्यांनी कौतुक केले.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या मेहनतीसोबतच प्राचार्य व निदेशकांच्या योग्य नियोजनाला दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देत त्यांना रोजगाराभिमुख बनविण्याचे काम नूतन औद्योगिक प्रशिक्षण केंद्र यांचे कडून सातत्याने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.











Post a Comment