यंदा १२ ऑगस्ट रोजी दीप अमावास्या आहे, तिलाच आपण दिव्यांची अमावास्या असेही म्हणतो, त्यादिवशी दिव्यांच्या पूजेचे धार्मिक महत्त्व काय ते जाणून घेऊ.
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
दिनदर्शिकेतील (कॅलेंडरमधील) केशरी रंगाने भरलेले रकाने पाहिले की प्रत्येकाच्या मनाला एक वेगळीच उभारी येते. हे केशरी रकाने म्हणजेच सर्व महिन्यांचा राजा असलेल्या 'श्रावण मासाच्या' आगमनाचे, सण-उत्सवांचे आणि व्रत-वैकल्यांचे मंगलमय चिन्ह असते. अशा या पवित्र श्रावण मासाच्या स्वागतासाठी आपल्या भारतीय संस्कृतीने आषाढ अमावस्येची एक अतिशय सुंदर ओळख करून दिली आहे, ती म्हणजे 'दीप अमावस्या' (ज्याला ग्रामीण भागात 'दिव्यांची आवस' असेही म्हटले जाते). मात्र, दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत काही प्रवृत्तींनी या पवित्र तिथीला 'गटारी' (Gatari Amavasya) असे विकृत नाव देऊन आपल्या उदात्त संस्कृतीला बट्टा लावला आहे. त्यात बदल आपणच करायला हवा.
यंदा ही दीप अमावस्या(Deep Amavasya २०२६) बुधवार, १२ ऑगस्ट रोजी साजरी होणार आहे, त्याच दिवशी खग्रास सूर्यग्रहणदेखील(Solar Eclipse 2026) आहे आणि दुसर्या दिवशी अर्थात १३ ऑगस्ट रोजी श्रावणमास(Shravan 2026) सुरू होत आहे.
'गटारी' नव्हे, आहारावरील नियंत्रणाचा संदेश !
श्रावण महिन्यात मंगळागौरी, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, गोकुळाष्टमी यांसारख्या विविध सणांची रेलचेल असते. सणाचे आणि वातावरणाचे पावित्र्य राखण्यासाठी धर्मशास्त्राने सबंध महिनाभर मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य करण्याचा पायंडा पाडला आहे.
परंतु, महिनाभर जे खायचे किंवा प्यायचे नाही, ते सर्व महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी अतीप्रमाणात 'चापून घेणे' किंवा पिणे, हा संस्कृतीचा आणि आरोग्याचा पूर्णपणे गैरअर्थ काढणे आहे. डॉक्टर जेव्हा रुग्णाला पथ्य पाळायला सांगतात, तेव्हा त्याचा हेतू आहारावर संयम आणणे हा असतो. जर आपण दोन्ही वेळचे जेवण एकाच वेळी ताटात वाढून घेणार असू, तर त्या पथ्याचा काय उपयोग? हाच नियम माणसाच्या मनावर आणि जिभेवर ताबा राहावा म्हणून धर्मसंस्कृतीने आखून दिला आहे.
दिव्यांच्या प्रकाशातील गूढ जीवनसंदेश
मद्यपींना पिण्यासाठी कोणत्याही निमित्ताची गरज नसते; आनंद असो वा दुःख, ते पिण्याचे समर्थन करतातच. अशा काही मूठभर लोकांनी आषाढ अमावस्येला 'गटारी' घोषित करून अक्षरशः गटारात लोळण्याचा परवाना मिळवला आहे. मात्र, हे वागणे म्हणजे आपणच आपल्या हाताने संस्कृतीची विटंबना करण्यासारखे आहे.
आषाढ अमावस्येच्या रात्री आकाशात चंद्राची अनुपस्थिती (काळोख) असते. पण हा काळोख दूर करण्यासाठी घरातील शेकडो दिव्यांचा प्रकाश ती उणीव भरून काढतो. हा केवळ पूजेचा विधी नसून आयुष्यासाठी एक खूप मोठा संदेश आहे— "जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात संकटांचा काळोख पसरतो, तेव्हा उदास न होता आशेच्या एका लहानशा पणतीने का होईना, तो काळ साजरा करा; तुमच्याही आयुष्यात श्रावणाचा आनंद नक्कीच येईल !"
'कुलदीपकाचे' औक्षण आणि दिव्यांचे पूजन
दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व लहान-मोठ्या दिव्यांची (पितळी, तांब्याचे आणि मातीचे दिवे) स्वच्छता करून त्यांना उजळवले जाते आणि त्यांची पूजा केली जाते.
या दिवशी घरातील दिव्यांचे तेज आपल्या 'कुलदीपकाला' म्हणजेच मुला-मुलींना लाभावे, त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर व्हावा, म्हणून त्यांना दिव्याने ओवाळण्याची (औक्षण करण्याची) अत्यंत सुंदर पद्धत आपल्याकडे आहे.
'धर्मो रक्षति रक्षित:' — संस्कृतीचे रक्षण हीच आपली जबाबदारी!
उद्या जर तुम्हाला कोणी विचारले की, "यंदा गटारीला काय विशेष प्लॅन?" तर त्यांना अगदी ठामपणे आणि खडसावून सांगा, "त्या दिवशी 'दिव्यांची आवस' (दीप अमावस्या) आहे, गटारी नव्हे!"
आपण आज जे वागू, जे आचार-विचार जपून ठेवू, त्याचेच अनुकरण येणारी पुढची पिढी करणार आहे. म्हणूनच त्यांच्यासमोर योग्य आणि विचारांचा आदर्श ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. शास्त्रात म्हंटलेच आहे— 'धर्मो रक्षति रक्षित:' अर्थात जो धर्माचे आणि संस्कृतीचे रक्षण करतो, त्याचे रक्षण धर्म करतो ! चला तर मग, या दीप अमावस्येला आपल्या घरातील आणि मनातील दिवे उजळून श्रावणाचे पवित्र स्वागत करूया !
Web Title : दीप अमावस्या २०२६: 'गटारी' हा संस्कृतीचा अपमान; काय सांगते दिव्यांच्या अवसेची परंपरा?
Web Summary : 'दिव्यांची अमावास्या' म्हणूनही ओळखली जाणारी 'दीप अमावास्या' श्रावण महिन्याच्या आगमनाचे प्रतीक आहे. हा लेख 'गटरी' (Gatari) या शब्दावर टीका करून त्याला सांस्कृतिक अपमान मानतो आणि आहाराबाबत संयम बाळगण्याचा संदेश देतो. हे दीप प्रज्वलित करण्याच्या आणि कुटुंबाचा सन्मान करण्याच्या परंपरेवर प्रकाश टाकते, तसेच सांस्कृतिक मूल्यांच्या जतनावर भर देते.










Post a Comment