Khandesh Darpan 24x7

50-100 रुपयांच्या बदामावरून राईचा पर्वत करू नका?: नांदेड दुष्काळ बैठकीतील काजू-बदामाच्या प्रश्नावर खासदार संजय जाधव पत्रकारांवर भडकले


खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -



नांदेड येथील विभागीय दुष्काळ आढावा बैठकीत सुकामेव्यावर ताव मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकारावरून राज्यभरातून टीकेची झोड उठत असतानाच, यावर जाब विचारणाऱ्या पत्रकारांवर परभणीचे शिंदे गटाचे गद्दार खासदार संजय (बंडू) जाधव चांगलेच संतापले. "मी काय माणूस नाही का? भूक लागली म्हणून खाल्ले; 50-100 रुपयांच्या सुकामेव्यावरून राईचा पर्वत कशाला करता? हा मीडियाचा फालतू धंदा आहे," अशा शब्दांत त्यांनी पत्रकारांवरच संताप व्यक्त केला. दरम्यान, या प्रकारावर सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नेमके काय घडले होते?

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मंत्री, खासदार व आमदारांसमोर काजू-बदामाच्या प्लेट्स ठेवण्यात आल्या होत्या. खासदार संजय जाधव हे बदाम खात असतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. बैठकीत उपस्थित राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर टेबलावरून या प्लेट्स तातडीने हटवण्यात आल्या होत्या.


पत्रकारांच्या प्रश्नावर खासदार संजय जाधव यांचा पारा चढला

व्हायरल व्हिडिओवरून प्रसारमाध्यमांनी जाब विचारला असता खासदार संजय जाधव यांनी भडकून उत्तरे दिली. "मी काय माणूस नाही का? लहान मुलांसारखे काय प्रश्न विचारता? माझ्यावर टीका होतेय तर होऊ द्या, मी ती स्वीकारायला तयार आहे, तुम्ही माझी काळजी करू नका. समोर ठेवले होते आणि कोणाला भूक लागली म्हणून खाल्ले, तर त्यात एवढा मोठा काय गुन्हा झाला? दुष्काळ आहे म्हणून कोणी काही खाणारच नाही का?"


पुढाऱ्यांना का विचारता, जिल्हाधिकाऱ्यांना विचारा

“हा विषय प्रशासनाचा आहे. पुढारी किंवा मंत्र्यांनी तिथे काजू-बदाम आणून ठेवण्याची मागणी केली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना विचारा की तुम्ही हे का ठेवले? 50-100 रुपयांच्या ड्रायफ्रूट्सवरून एवढा राईचा पर्वत करण्याची काही गरज आहे का? दुष्काळात शेतकरी त्रस्त आहे, त्या मुख्य विषयावर चर्चा करा. काजू-बदाम खाण्यासारख्या निष्फळ विषयांवर चर्चा करणे हा मीडियाने चालवलेला फालतू धंदा आहे. ज्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायचे आहे तिकडे करा," असा उलट सल्लाही त्यांनी पत्रकारांना दिला.

बैठकीतील असंवेदनशीलतेवरून आधीच उमटलेत तीव्र पडसाद

या बैठकीवरून आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त करत, "प्रशासनाने अशा गंभीर विषयांच्या बैठकीत अशा गोष्टी टाळायला हव्यात आणि संवेदनशीलता दाखवायला हवी," असे म्हटले होते.

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी "अधिकाऱ्यांना डोकं नाही का? अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने आम्ही मंत्री बदनाम होतो," असा संताप व्यक्त केला होता.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, "शेतकरी आत्महत्या करत असताना दुष्काळाच्या बैठकीत काजू-बदाम चघळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे," असा आरोप केला होता.

एककीकडे मराठवाड्यात महिना-दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने पिके करपून शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे, तर दुसरीकडे आढावा बैठकीतील सुकामेवा आणि त्यावर लोकप्रतिनिधींनी दिलेली ही आक्रमक प्रतिक्रिया यामुळे बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची भावना ग्रामीण भागात व्यक्त होत आहे.


या बातमीचे प्रायोजक आहे. 

जाहीरात


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



सौजन्य: दै. दिव्यमराठी    व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 






Post a Comment

Previous Post Next Post